औरंगाबाद -टीम बिंदास
सौरभ लाखे :
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस लोटले आहेत. मतमोजणीच्या आकडेवारीवरून विजय पराभवाचे गणित मांडत सोशल मीडियावर दणक्यात व्हिडिओ -मेसेजचे युद्ध सुरू झाले आहे. विशेषता शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव समर्थकांतील हे सोशल वार चर्चेचा विषय बनले आहे. गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा अभेद्य गड राहिलेल्या औरंगाबादेत चंद्रकांत खैरे पराभूत होतील अशी कल्पनाही भल्याभल्यांनी केली नव्हती. कित्तेक वर्ष राजकीय घडामोडींचे बारीक निरीक्षण करणाऱ्यानेही लढत अटीतटीची होईल मात्र खैरे जिंकतील असे भाकीत वर्तविले होते. हे सर्व दावे एमआयएमच्या विजयाने खोटे ठरविले. हर्षवर्धन जाधव यांना तब्बल पावणे तीन लाख मते पडल्याने खैरे यांचा पराभव निश्चित झाला, यात शंका नाही. हा पराभव शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पराभवाचा हा संताप सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला आहे.
हिंदुद्वेषी म्हणत जाधवांचा समाचार शिवसैनिक सोशल मीडियातून घेत आहेत. मराठा समाजाला फोडण्याचे षड्यंत्र जाधवांनी एमआयएम सोबत रचले, असाही आरोप मीडियातून होत आहे. एकीकडे जाधवांना खलनायक ठरविण्याची होड लागलेली असताना जाधव समर्थकांनीही कंबर कसली आहे. व्हिडिओ तसेच मेसेज द्वारे शिवसैनिकांना प्रत्युत्तर दिल्या जात आहे. खैरेंच्या पराभवाचे खापर मराठा समाजावर फोडू नये, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हा समाज कायमच पुढे राहिला आहे. खैरे म्हणजेच हिंदुत्व असे समजण्याचे कारण नाही, असाही दावा जाधव समर्थक करतात. शहराला किती दिवस अशांत ठेवायचे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शहराचा रखडलेला विकास वेगाने पुढे जावा यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जीव तोडून मेहनत घेतली. जाधव हरल्याचे दुःख हिंदूत्ववाद्यांना का नाही, असा सवालही विचारला जात आहे. हर्षवर्धन कायमच शिवरायांचे सच्चे पाईक आहेत आणि राहतील, असाही दावा समर्थक करीत आहेत.
समाजस्वस्थ बिघडविणारे मेसेज..
शिवसेना आणि जाधव समर्थक यांच्यातील सोशल वॉर मूळे समाजस्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जातीपातीची गणिते मांडून टीका करणाऱ्या या मेसेजमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावर वरील अशा पोस्टवर कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.