B N N
शेख अझर
वैजापूर ,औरंगाबाद
शिक्षक नेत्याच्या वाढदिवसासाठी जाणे तालुक्यातील धोंदलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील 'त्या ' नऊ शिक्षिकांना चांगलेच महागात पडले. कर्तव्यावर असतांना विनापरवानगी शाळेला दांड्या मारून वाढदिवसाला जाणाऱ्या त्या शिक्षिकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने घेतला आहे.
कर्तव्यावर असतांना तब्बल नऊ शिक्षिकांनी शाळेला दांड्या मारून शिक्षक नेत्याच्या वाढदिवसाला हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तालुक्यातील परसोडा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रभारी केंद्रप्रमुखांचा 23 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे तालुक्यातील धोंदलगाव व परिसरातील तब्बल नऊ शिक्षिकांनी कर्तव्यावर असतांना त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विनापरवानगी थेट परसोडा गाठले होते.
या चौकशीदरम्यान संबंधित शिक्षिका या शालेय वेळेत शिक्षक नेत्याच्या वाढदिवसासाठी गेल्याचे गेल्याचे सिध्द झाले. त्यामुळे संबंधित शिक्षकांविरुध्द कारवाई करणे योग्य असल्याचा अहवाल कांबळे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिवेकर यांच्याकडे सादर केला. तत्पूर्वी शिक्षिकांनी केलेला खुलासा शिक्षण विभागाने अमान्य केला आहे. परंतु प्रक्रियेचा भाग म्हणून प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांनी त्या नऊ शिक्षिकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला होता.
दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांचा चौकशी अहवाल, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मासिक सर्वसाधारण सभेत याबाबत उठविलेले रान आदी बाबी लक्षात घेऊन मनीष दिवेकर यांनी त्या शिक्षिकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढदिवस प्रकरण शिक्षिकांच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांना चांगलेच महागात पडले. या वाढदिवस प्रकरणामुळे शिक्षण क्षेञाचे वाभाडे निघून अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती.
या शिक्षिकांचे वेतन केले कपात
एस. एस. पोंदे, एल. एस. गायकवाड, एम. टी. बिचेवार ( धोंदलगाव ), बी.बी. घुणावत ( पानसरेवस्ती), एस. के. मेटे, एस. बी. देशपांडे ( आदिवासीवस्ती शाळा ) , व्ही. एस. आकोलकर ( साखरेवस्ती शाळा ), एस. आर. गिरवले ( आंबिकानगर शाळा ), एस. बी. भंडारे ( जमनवाडी ) या सर्व शिक्षिका असून शालेय वेळेत वाढदिवसासाठी गेल्या होत्या. या सर्वांचे एक दिवसांचे वेतन कपात करण्यात आले आहे.
तालुक्यातील धोंदलगावसह परिसरातील नऊ शिक्षिका शालेय वेळेत विनापरवानगी शिक्षक नेत्याच्या वाढदिवसासाठी गेल्याचे चौकशी अहवालातून सिध्द झाले आहे. त्यामुळे या सर्वांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत शिक्षिकांना कळविण्यात आले आहे.
- मनीष दिवेकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, वैजापूर