नांदगाव येथे दहा वर्षानंतर झालेल्या आमसभेत नागरिकांनी वाचला तक्रारीचा पाढा

0

B.N.N
अरुण हिंगमिरे
नांदगाव, नाशिक


नांदगाव येथील नवनिर्वाचित आ. सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२९ जानेवारी रोजी पहिलीच आमसभा एक ना अनेक विषयांनी गाजली यावेळी उपस्थित तालुक्यातील नागरिकांना आ.कांदे यांच्या समोर तक्रारीचा पाढाच वाचला. 

याप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तालुक्याच्या रथाची दोन चाके आहेत,आणि जनतेच्या हितासाठी या दोन चाकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे.तुम्हाला त्रास झाला तर मला सांगा,मात्र जनतेला त्रास झाला तर तुमची ही गय केली जाणार नाही.! असा सज्जड इशारा आमदार सुहास कांदे यांनी आज झालेल्या आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील प्रशासनाला दिला.

    सन २००८ नंतर म्हणजेच तब्बल दहा वर्षानंतर आमसभा घेण्याचे धाडस विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी दाखवले.पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी आमसभा घेण्याचा उद्देश असतानाही गेल्या दहा वर्षात एकही आमसभा होऊ शकलेली नव्हती.त्यामुळे मतदार संघातील जनतेत कमालीचे औत्सुक्य निर्माण होऊन हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झाले होते.


       नांदगाव तालुका व मालेगाव तालुक्यातील मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या शेतकरी,ग्रामस्थ,मजूर,महिला,तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्येचा पाढा वाचला.यावेळी आमदार श्री.कांदे यांनी बघतो...करतो....अशी साचेबद्ध उत्तरे न देता प्रत्यक्ष कार्यवाही अनेक प्रकरणात करत ; आगामी काळात प्रशासनाला जनतेसोबत कसे वागावे याचा वस्तुपाठच घालून दिला.सामाजिक वनीकरण विभागाकडून माणिकपुंज गावासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून ; आतापर्यंत फक्त ५३ लाख रुपयेच खर्च झाल्याची बाब शाईनाथ रामकर यांनी उपस्थित केली,व या योजनेअंतर्गत मिळालेले बल्ब या अधिकाऱ्यांनी विकले असल्याचा आरोप केल्यानंतर आमदार कांदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले.

    तालुका वनविभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप खुद्द आमदार कांदे यांनीच केल्याने वन विभागविरोधात ज्या काही तक्रारी झाल्या,त्याला अप्रत्यक्षरीत्या पुष्टी मिळाली.शहरातील अनेक सामाजिक संस्था वन विभागाकडे वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची मागणी करत असताना ही वन विभाग मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची बाब असो वा हरिणांकडून शेती पिकांचे नुकसान होत असल्याच्या मुद्द्यावर आमदार सुहास कांदे यांनी वनक्षेत्रपाल दत्तात्रय बोरसे यांना चांगलेच धारेवर धरले.व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.भाजपचे शहराध्यक्ष उमेश उगले यांनी थेट वनक्षेत्रपाल श्री.बोरसे यांनाच निलंबित करण्याची मागणी यावेळी केली.वनविभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्याचे व चोरट्या वाळू प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप ही अनेकांनी केला,त्यात काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधींचा समावेश होता.नांदगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र देशमुख यांनी तर वन विभागाचे कर्मचारी च हरणांचे मांस खात असल्याचा गंभीर आरोप भर आमसभेत केला.

     सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील यांनी एकूण १२ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे,मात्र सदर ठेकेदार काम सुरू करत नसल्याची बाब स्पष्ट केल्यानंतर आमदार कांदे यांनी सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेकांनी मांडला.मात्र कुठला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत अन कुठला जिल्हा परिषदच्या ताब्यात याबाबत अनेकांना याचे आकलन होत नसल्याने तक्रार करताना अनेकांचा गोंधळ उडाला.माजी उपसभापती सुभाष कुटे यांनी ही अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या.अस्वलदरा या फासेपारधी समाजाच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याची बाब या वस्तीवरील नरहरी भोसले यांनी यावेळी केली.व आमदार साहेब तुम्ही आमच्या गावाला या म्हणजे रस्ता तरी होईल.असे आर्जव केले.

तर तालुका कृषी विभागाने अनेक योजनांत वापरली जाणारी लॉटरी पद्धत बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.तर कांदाचाळी ऐवजी शेततळ्याना प्राधान्य देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या कामात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा ही चांगलाच गाजला.तसेच महसूल विभागाकडून गतिमान काम होत असल्याचा अहवाल तहसीलदार योगेश जमदाडे यांनी मांडला असता ; खुद्द आमदार सुहास कांदे यांनी तलाठी वर्गाला शिस्त लावण्याची सूचना केली.भर दुपारीच अनेक तलाठी मद्य प्राशन करून कामकाज करत असल्याची बाब खुद्द आमदारांनीच आमसभेला सांगितली.

      वीज वितरण कंपनी कारभाराचा अहवाल उपअभियंता ज्ञानेश्वर वाटपाडे यांनी मांडला,त्यावर अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून होत असलेल्या अडवणुकीबाबत,पैशाची मागणी होत असल्याबाबतच्या गंभीर तक्रारी यावेळी करण्यात आली.चांदोऱ्याचे हरेश्वर सुर्वे यांनी ही वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत तक्रारी केल्या.

    नांदगाव,मनमाड नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत ही अनेक तक्रारी सुमित गुप्ता,अँड.गुलाबराव पालवे,यांच्यासह नांदगाव,मनमाड च्या नागरिकांनी यावेळी केल्या,त्या तक्रारींना नगराध्यक्ष राजेश कवडे,मनमाड चे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी उत्तरे दिली.तर नांदगावच्या मुख्याधिकारी आमसभा संपण्यापूर्वीच सभेतून निघून गेल्याचा मुद्दा अधोरेखित करून सुमित गुप्ता यांनी त्यांना पाचारण करण्याची मागणी यावेळी लावून धरली असता,नगराध्यक्ष कवडे यांनी जबाबदारी घेतल्याने सुमित गुप्ता ने स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त करून शहरातील नागरिकांचा शेवटचा प्रवास सुखाचा व्हावा,यासाठी आमदार साहेबांनी लक्ष देण्याची मागणी केली.

     या आमसभेला जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे,नगराध्यक्ष राजेश कवडे,गणेश धात्रक,बाजार समितीचे सभापती तेज कवडे,किशोर लहाने,संजय सांगळे,पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब हिरे,जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,पंचायत समिती सदस्य सुमन निकम,अर्चना वाघ,विद्या पाटील,उपसभापती श्रीमती सुशिला नाईकवाडे,आमदार सुहास कांदे यांच्या सौ.अंजली कांदे,संतोष बळीद,काँग्रेस तालुकाध्यक्ष समाधान पाटील,सागर हिरे,प्रमोद भाबड,आमदार कांदे यांचे स्वीय सहायक योगेश चोथवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे,शहराध्यक्ष सुनील जाधव,विष्णू निकम,सुनील पाटील,माजी सभापती विलासराव आहेर,मनमाड शहराध्यक्ष मयूर बोरसे आदींसह हजारो शेतकरी,ग्रामस्थ,नागरिक,महिला तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी,विस्तार अधिकारी,प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती नंदा ठोके,सर्व ग्रामसेवक,तहसीलदार योगेश जमदाडे,व सर्व महसूल अधिकारी ,कर्मचारी,नांदगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व सर्व पोलीस कर्मचारी,सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमीअभिलेख,वन विभाग,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.रोहन बोरसे,कृषी विभाग,सामाजिक वनीकरण अशा सर्व विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top