राष्ट्र सेवा दलाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा

0


B.N.N
अरुण हिंगमीरे
मालेगाव, नाशिक

मालेगाव- येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने शिवजयंती निमित्त शिव चरित्र व्याख्याते अनिल पाटील यांचे 'तुकोबा ते शिवबा' याविषयावर व्याख्यान झाले. यानिमित्ताने शिवविचार चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
      छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली. श्री पाटील यांनी तुकोबा ते शिवबा या वर सुंदर गुंफण घालत सांगितले की बहुमताच्या मागे न लागता विवेकपूर्ण विचार करून योग्य अयोग्य काय हे तपासून घेऊन मगच कार्य करावे हाच तुकोबांचा विचार घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले.

शिवराय म्हणजे नुसती तलवार नव्हे तर तो एक महान विचार आहे. तो विचार समजून घेणे आवश्यक आहे. शिवराय कुठल्याही धर्माचे नव्हते तर ते रयतेचे होते. तुकोबांनी कर्मकांडावर प्रहार केले तोच विचार घेऊन शिवरायांनी गड किल्ले उभारताना सापडलेल्या मुर्त्या वितळवून ते धन स्वराज्याचे कामी वापरले. तुकोबांनी जाती धर्म भेदाभेद अमंगळ असे सांगितले तोच विचार शिवबानी पुढे नेत सैन्यात जातीभेद धर्मभेद न पाळता योग्यतेनुसार पदे दिलीत. अतिशय परखड व ओघवत्या शैलीतील मांडणी श्रोत्यांना भावून गेली. याप्रसंगी शिवविचार चित्र प्रदर्शनी ही भरविली होती. ती बघून अनेकांनी सांगितले आज नव्याने शिवराय समजले.
यावेळी व्याख्याते श्री पाटील व प्रमुख अतिथी उमेश अस्मर यांचा सत्कार  भारतीय संविधान हे पुस्तक देऊन करण्यात आला.                                           व्यासपीठावर  राज्यसचिव नचिकेत कोळपकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ, प्रमुख अतिथी उमेश आस्मर व्याखाते अनिल पाटील हे होते. सुत्रसंचालन राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी केले. अतिथी परिचय जिल्हा संघटक रविराज सोनार यांनी करुन दिला.   तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ यांनी आभार मानले. यावेळी तालुका संघटक सुधीर साळुंखे यांनी क्रांती गीत सादर केले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम सांगता झाली.
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती वाणी, राजीव वडगे, प्रवीण वाणी, अशोक फराटे, अशोक पठाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सम्राट गणेश मंडळ, महादेव मंदिर ट्रस्ट यांचेसह विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top