B.N.N
अरुण हिंगमिरे
मनमाड, नाशिक
मनमाड शहराजवळील पानेवाडी शिवारात टँकर क्रमांक (एम.एच - 04-डीएस-0291) मधून शनिवारी पहाटेच्या सुमारास बेकायदेशीरपणे पेट्रोलियम पदार्थ काढताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्यावर विविध कलमानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करून टँकरसह एकूण 33 लाख 11 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी दिली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड जवळील पानेवाडी शिवारात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम याfसह गॅसचे टर्मिनल आहेत. या ठिकानाहून उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी इंधन पुरवठा केला जातो. यातील काही टँकर मालक व चालक हे बनावट चावीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे पेट्रोल व डिझेल काढून बाहेर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (शनिवारी) पहाटे भारत पेट्रोलियम समोरील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील मैदानात (एमएच-04-डीएस-0291) मधून टँकर मालक भाऊराव वसंत वाघ (वय 37 रा. बुद्धलवाडी मनमाड), टँकर चालक अप्पा गणपत घुगे (वय 38 रा. खादगाव) हे दोघे डिझेल काढताना आढळून आले.
या कारवाईत टँकरसह एकूण 33 लाख 11 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याआधीही या ठिकाणाहून अनेक पेट्रोल डिझेल काढणाऱ्या टँकर चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही येथील चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नसून गेल्या 3 महिन्यांत पेट्रोल डीझेल चोरी करणाऱ्या 25 टँकरवर कारवाई करण्यात आली आहे.
मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी आज रस्त्यावर उभ्या असनाऱ्या 18 टँकरवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलियम पदार्थांसह इतर चोऱ्यांचा मुळासकट नायनाट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजच्या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळी, पोलिस हवालादर सुनील पवार, पोलीस नायक संदीप वनवे, पोलीस शिपाई मुदस्सर शेख, पोलीस शिपाई गौरव गांगुर्डे, पोलीस शिपाई बस्ते, चंदू मांजरे, आदी सहभागी होते.