B.N.N
नेटवर्क
निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशी होणार हे निश्चित झालं आहे. कारण राष्ट्रपतींनी या प्रकरणातील पवनची दया याचिका फेटाळली आहे. आपल्याला फाशीऐवजी जन्मठेप देण्यात यावी अशी याचिका पवन कुमारने केली होती. ती कोर्टाने फेटाळल्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचना केली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे निर्भयाच्या आरोपींना फाशी होणारच हे निश्चित झालं आहे. तिहार जेलमध्ये जल्लाद पवन याने आरोपींना फाशी देण्याचा सरावही केला आहे. त्यामुळे ३ मार्च अर्थात उद्या सकाळी ६ वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार हे निश्चत झालं आहे.
या गुण्ह्यातील घटनाक्रम असा आहे, दिल्लीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला . तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकूनही देण्यात आले. १६ डिसेंबर २०१२ ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र २९ डिसेंबर २०१२ ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. २०१३ च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
हायकोर्टाने २०१४ मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. तर मे २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली. ट्रायल सुरु असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. एक आरोपी अल्पवयीन होता त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
त्यानंतर या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या चारही आरोपींनी आधी कोर्टात आणि मग राष्ट्रपतींकडे दया याचिका केली. मात्र ही याचिका कोर्टाने आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी फेटाळून लावली. त्यामुळे आता या चारही जणांना फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अखेर निर्भयाला न्याय मिळाला अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे.