केज बीड (प्रतिनिधी):-धुलिवंदनानिमित्त केज तालुक्यातील विडा गावात एक अनोखी परंपरा मागील नव्वद वर्षांपासून जोपासली जात आहे . या गावातील जावयास आजच्या दिवशी गर्दभस्वारीचा मान मिळतो . अर्थात या दिवशी त्या जावयाची गाढवावर बसवून गावभर धिंड काढली जाते . ही परंपरा विडेकर ग्रामस्थांनी आजही जोपासली आहे . होळीच्या चार दिवस आधीपासूनच विडा गावात जावयाचा शोध सुरू होता . त्यासाठी चार पथकेही तयार करण्यात आली होती . यंदाचा मान हा बाबासाहेब पवार या ग्रामस्थांचे जावई दत्तात्रय गायकवाड यांना मिळाला असल्याने होळीच्या रात्री त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली .
धुळवडीच्या दिवशी सकाळी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गाढव आणून त्यावर गायकवाड यांना बसवण्यात आले आणि त्यांची गावभर धिंड काढण्यात आली .
येथील गावच्या हनुमान मंदिरा समोर ११ वाजता मिरवणुक संपली . नंतर जावयाला आंघोळ घालून नवीन कपड्यांचा आहेर सरपंच काळे यांच्या हस्ते देण्यात आला . हा आगळा वेगळा धुलिवंदनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिक मोठ्या संख्येने हजर असतात .