कुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही

0
निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षा पासून ते माणसा पर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून! 

 , कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण 
स्वतःच्या महत्वाकांक्षे साठी आई बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर हंडगी जात फक्त माणसाची असते!त्याला  हत्तीच्या जीवाचं काय पडतंय!

नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटोबाबतची कहाणी अत्यंत करूण आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. 27 में 2020 ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने माफ कर बहिणी म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली! 


सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली.
 त्याही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली!

शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने बाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले गेले तिला वाट दाखवण्या करता पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली! दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण 5 च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली.पोस्टमोर्टम मध्ये कळलं ती गर्भवती होती.

मोहन कृष्णन ने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला! माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता! तिला त्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही! तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं

 20 महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या? तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती? वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती? 1200 फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढुन गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाहीतर प्राण्यांमधली!

एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं आपण? असं समजू नका तुम्ही घरात बसला आहात म्हणून तुम्ही जबाबदार नाही! माणूस म्हणून केलेल्या असल्या हीन अत्याचाराची फळे collective fate सामूहिक नशिबाच्या रूपाने प्रत्येक माणसाच्या वाट्याला भोगायची येतात!

कोरोना, चक्रीवादळ, आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल का? असा प्रश्न मी फालतू म्हणून उडवून लावणार तेव्हढ्यात नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो! 
डोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं! 
एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित माणसांनी बनवलेल्या कोर्टात होणार नाही पण लक्षात ठेवा जेंव्हा निसर्ग न्याय करायला उतरेल तेंव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही! या मृत्यूचा न्याय व्हावा!

- कधी न भेटलेल्या प्रिय हिरकणीसाठी!! 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top