सौरभ लाखे
बिंदास न्यूज नेटवर्क
करोनाच्या पार्श्वभुमिवर 50 भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सप्ताह.
योगीराज गंगागिरी महाराज
173 व्या सप्ताहाची सांगता
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.
या गोष्टींनी आपली चित्ताची शुध्दी होत असते . आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.त्यामुळेच अखंड हरिनाम सप्ताह सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र सरला बेटावर असलेल्या सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील सांगता पर्वाच्या किर्तन सेवेत ते लक्ष लावून अंतरी पहातात नर नारी " ज्ञानेश्वर महाराजांच्या गौळण पर अभंगाचे विवेचन करताना महाराज म्हणाले की? ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो तर जिज्ञासू उदारता मागतो, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत् मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात.
नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही कर्मानी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत असे महाराज म्हणाले .
व्यासपीठावर यावेळी सप्ताह समिती अध्यक्ष वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी सभापती बाबासाहेब जगताप, नागेबाबा पतसंस्थेचे कडुभाऊ काळे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे,कमलाकार कोते, ,सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज , बाळासाहेब महाराज रंजाळे , दौलतराव मनाळ,प्रदीप साळुंके ,आदी उपस्थित होते