माहिती संकलन
सौरभ लाखे
पोषण अभियान अंतर्गत आधीच सुरू असलेले काम, कुपोषित बालकांच्या घरी भेटी देणे, गरोदर स्तनदा माता, किशोरवयीन मुलीना आहार व आरोग्य तसेच पोषण याविषयी कामे सुरू असताना आता पुन्हा कोरोना काळात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी नव्याने कामे अंगणवाडी सेविकांवर थोपवण्यात येत असल्याने ही कामे न करण्याची भूमीका आयटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने घेतली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची कामे करणार नसल्या बाबत बुधवार (ता. २३) रोजी वैजापूरचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, बालविकास अधिकारी कार्यालयात प्रमोद जाधव यांना निवेदन देण्यात आले.
अत्यल्प मानधनात आधीच अंगणवाडी सेविका काम करत आहेत. सतत काम करून सुद्धा शासन दरबारी त्यांची कुठेही दखल घेतली जात नाही. कोरोना काळात यापूर्वी पासूनच पोषण आहार वाटप, बालकांचे वजन , ५५ वर्षावरील इसमाचा सर्व्हे आणि आता पोषण अभियान अंतर्गत अनेक कामे अंगणवाडी सेविका करत असताना शासनाने ११ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमातून दररोज पन्नास घरांचा सर्व्हे, ऑक्सिमिटर तपासणी, लोकांना कोरोना विषयी व्यक्तिशः माहिती देणे अशी कामे करण्याची तंबी दिली जात आहे.
दरम्यान, अंगणवाडीची कामे न थांबता या मोहिमेची कामे करण्याची सक्ती केली जात आहे. सगळी कामे २५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे फर्मान शासनाने सोडले आहे. ही कामे न केल्यास वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडून, पर्यवेक्षिका, तहसीलदार यांच्याकडून नोकरीवरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा तक्रारी प्राप्त होत असल्याने आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेत कामे न करण्याची भूमिका घेतली असून कामावर बहिष्कार टाकला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती यांच्या आदेशानुसार वैजापूर तालुकाध्यक्ष कॉम्रेड शालिनी पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्याध्यक्ष कॉम्रेड शोभा तांदळे यांच्या नेतृत्वाखाली मंदाकिनी जाधव, अनिता मतसागर, सविता जाधव यांनी तहसील कार्यालय व बालविकास प्रकल्प कार्यालयास निवेदन दिले.