संतोष गंगवाल
अयोध्येत प्रभु श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवगाव रंगारी ता कन्नड येथील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सोमवारी ( ता २२) दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, व अभुतपुर्व मिरवणूक काढुन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी सर्वधर्मीय समाजबांधव सहभागी झाले होते.
सोमवारी पहाटेपासूनच येथील गांधी चौक व पोलीस ठाण्यासमोरील मंदिरात भाविकांची वर्दळ सुरु होती.युवकांनी रात्रीच गांवातील मुख्य रस्ता व चौकाचौकात भगव्या पताका व भगवे झेंडे लावत सर्वत्र भगवेमय केले.
दोन्ही मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.रामलल्लाच्या आगमनासाठी प्रत्येक घरासमोर सडा व मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या.
पोलीस ठाण्यासमोरील मंदिरापासून प्रभु श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत संत सावता मंडळाच्या ढोल पथकाने रंगत आणली.मिरवणुकीत युवकापासुन ते वृद्धांपर्यंत महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.फटाक्याची आतिषबाजी व श्रीरामाचा जयघोषाने परिसर दुमदुमला होता.गांधीचौकातील राम मंदिरात ग्रामपंचायत सदस्य ललीत सुरासे व माजी ग्रामपंचायत सदस्य माया सुरासे या दाम्पत्याचा हस्ते अभिषेक व पुजन करण्यात आले. पोलीस ठाण्यासमोरील मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.तिथे महाआरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले